गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील चौघे ठार

दिंडोरी पोलीसनामा ऑनलाईन – घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मृतांमध्ये पती, पत्नी, मुलगा आणि पुतण्याचा समावेश आहे. रात्री जेवण करून झोपल्यानंतर स्फोट झाला अन होत्याचे नव्हते झाले.

मुरधीधर चौधरी हे दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे शेतात वस्तीवर वास्तव्यास होते.त्यांच्या घरी भावाचा मुलगाही आला होता. घरी चौधरी, त्यांची पत्नी, मुलगा आणि त्यांचा पुतण्या असे चारजण होते. मंगळवारी रात्री जेवणानंतर सर्वजण झोपले होते. त्यानंतर घरातील गॅसची गळती सुरु झाली होती. ही बाब कोणालाच लक्षात आली नाही. घरात दिवा सुरु होता. त्यामुळे गॅसने पेट घेतला आणि स्फोट झाला. त्यात घरातील सर्व साहित्याने पेट घेतल्याने झोपेत असलेल्या चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला.