अबुधाबीत नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला ४ लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अबुधाबी येथील अलगोस्तान हॉस्पिटलमध्ये नोकरीच्या आमिषाने तळेगाव दाभाडे येथील तरुणाला तब्बल ४ लाख रुपयांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी धनंजय शशिकांत धर्माधिकारी (२८, रा. अंबिका स्क्वेअर अपार्टमेंट, तपोधाम कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी अलगोस्तान हॉस्पिटलचे एच आर मॅनेजर, अंम्पायर ट्रव्हल एजन्सीच्या मिता फोबर्ट, बँक खातेदार वकिलखान, गौस मोहम्मद आणि अली वालीद (सर्व रा. अबुधाबी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ११ जानेवारीला धनंजय धर्माधिकारी यांना अलगोस्तान हॉस्पिटल अबुधाबी यावरुन ई मेल आला. त्याला त्यांनी उत्तर पाठविल्यानंतर त्यांना नोकरीचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला काही मामुली रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पासपोर्ट, प्रवास खर्च, तिकीटासाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून जयपूर, सिव्हिल लाईन बरेली येथील तिघांच्या खात्यात त्यांना पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी आॅनलाईन भरले. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर त्यांना आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलीस निरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
अशा आलेल्या ई मेलला शक्यतो उत्तर देऊ नये. तसेच हे ई मेल संबंधित कंपनीचे नसतात. हॅकर्स नामवंत कंपनीची बनावट वेबसाईट तयार करुन त्याच कंपनीकडून ई मेल असल्याचे भासवितात. तरी अशा ई मेलवर दिलेल्या लिंकवरुन संपर्क साधण्याऐवजी संबंधित कंपनीच्या मुळ वेबसाईटवर जाऊन खात्री करुन घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.