Pune-Lonavala लोकलच्या 4 फेऱ्यांमध्ये वाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   पुणे-लोणावळा लोकलच्या (Pune Lonavala Local) 4 फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आता याचा लाभ मिळणार आहे. टाळेबंदीनंतर 12 ऑक्टोबर पासून पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक सुरू केली गेली होती. आता यात 4 फेऱ्यांची वाढ झाल्यानंतर दोन्ही बाजून 8 फेऱ्या होणार आहेत.

टाळेबंदीनंतर (Lockdown) 12 ऑक्टोबर पासून पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतूक सुरू झाली होती. यात 4 फेऱ्यांचा समावेश होता. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत असलेल्या या सेवा अपुऱ्या पडत असल्यानं 26 ऑक्टोबरपासून पुणे आणि लोणावळ्यातून प्रत्येकी 2 अशा चार नव्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानुसार आता पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 6.25 आणि 8.05 वाजता तर सायंकाळी 4.15 आणि 6.02 वाजता लोणावळ्यासाठी लोकल सोडण्यात येत आहेत. लोणावळ्यातून सकाळी 9.55, सायंकाळी 5.30,5.50 आणि 7.35 वाजता पुण्यासाठी लोकल सोडण्यात येत आहे. पुणे रेल्वेनं स्पष्ट केलं आहे की, या सर्व गाड्या विशेष लोकल या श्रेणीतील आहेत.

Advt.

विशेष ओळखपत्राची आवश्यकता

अत्यावश्यक सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष लोकलसाठी विशेष ओळखपत्राची आवश्यकता आहे. संबंधितांना ओळखपत्र देण्याची जबाबदारी राज्य शासनानं पोलीस आयुक्तांकडे दिली आहे. क्यु आर कोड सह असलेल्या या ओळखपत्राशिवाय स्थानकात प्रवेश दिला जाणार नाही. पुणे-लोणावळा दरम्यानच्या सर्व स्थानकांमधील तिकीट खिडक्या सुरू ठेवण्यात आल्या असल्या तरी या ओळखपत्राशिवाय तिकिटे दिली जाणार नाहीत असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.