CAA : दंगल भडकवल्याप्रकरणी PFI च्या 4 जणांना अटक

बिजनौर : वृत्तसंस्था – सीएए विरोधात उत्तर प्रदेशात बिजनौर येथे आंदोलनावेळी लोकांना भडवकल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय)च्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या चार जणांनी दंगल घडवून आणण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी लोकांना चिथवले होते. लोकांना चिथवल्याची कबुली चौघांनी कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या चौघांना रविवारी बास्टा चुंगी येथून अटक केली आहे.

कारी निसार, आरिफ, दिलशाद आणि इद्रिस असे अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या चार सदस्यांची नावे आहेत. या चार जणांकडून पीएफआयच्या प्रचारासाठी साधन सामुग्रीही जप्त करण्यात आले असल्याचे चांदपूर पोलीस ठाण्याचे क्षेत्र अधिकारी राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले. या चौघांनी धार्मिक दंगली भडकवतानाच सीएएच्या विरोधासाठी शाहीन बागसारखे आंदोलन घडवून आणण्यासाठी छुप्या पद्धतीने काम करत असल्याची कबुली दिली आहे. चौघांवर गुन्हे दाखल करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान रसद पुरविल्याच्या आरोपावरून पोलिसांनी याप्रकरणी अटक केल्यानंतर बँक खात्याची चौकशी पोलिसांनी केली. या चौकशीत पोलिसांच्या हाती अनेक महत्वाचे पुरावे लागले आहेत. ही रक्कम सीएए आंदोलनासाठी गर्दी जमा करण्याकरिता वापरण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांची कसून चौकशी सुरु असून त्यातून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.