home page top 1

पिंपरीत ४ पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे जप्त ; तिघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – बेकायदेशीरपणे देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या तिघांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून चार पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे आणि एक टॅक्सी कार असा एकूण ४ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी पथकाने देहूरोड येथे केली.

मारुती वीरभद्र भंडारी (३०), सुलतान युसूफ खान (२०), सुमित उर्फ नकली उर्फ मारी गणेश पिल्ले (२७, सर्व रा. देहूरोड) या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी खंडणी दरोडाविरोधी पथकातील पोलीस नाईक प्रवीण कांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोडमधील बापदेवनगरमध्ये चार तिघांकडे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक विट्ठल बढे, चिट्टे, कर्मचारी नितिन लोखंडे, महेश खांडे, शैलेश सुर्वे आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे कसून चौकशी करत त्यांच्याकडून ४ देशी बनावटीची पिस्तूल, २२ जिवंत काडतुसे आणि एक टॅक्सी कार असा एकूण ४ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Loading...
You might also like