‘संचारबंदी’त पैसे घेऊन वाहनांना सोडणार्‍या पोलिसांचीच झाली ‘नाकाबंदी’; 4 पोलिस तडकाफडकी निलंबित

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमध्ये नाकाबंदीत वाहनचालकांकडून पैसे घेऊन त्यांना सोडून देणार्‍या पोलिसांची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नाकाबंदी केली आहे. सातपुते यांनी एका महिलेसह ४ पोलिसांना निलंबित केले आहे. हेडकाँस्टेबल रमेश सूरनार, पोलीस काँस्टेबल निखिल पवार, प्रवीण शिंपाळे व प्रियंका आखाडे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

सोलापूर जिल्ह्यात राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावर २८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून तेथे वाहनांची कागदपत्रे तपासून सोडली जातात. सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर जिल्हा तसेच परराज्यातील वाहनचालकांकडून भीमानगर नाकाबंदी पॉईटवर पैसे घेऊन सोडले जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चार दिवसांच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षकांना त्याचा अहवाल प्राप्त होताच त्यांनी पैसे घेणार्‍या चार पोलिसांना निलंबित केले.