केडगाव हत्याकांड त्या 4 पोलिसांना भोवले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन

जिल्हयातील केडगाव येथे शिवसेना पदाधिकार्‍यांची हत्या झाल्यानंतर शहरात निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या वेळी खातेबाह्य कृत्य केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. याबाबतचा आदेश अहमदनगरचे पोलिस अधिक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दि. 24 एप्रिल रोजी रात्री उशिरा काढला आहे.

अविनाश बर्डे, रविंद्र टकले, समीर सय्यद आणि सुमीत गवळी अशी बडतर्फ करण्यात आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांची नावे आहेत. कोतवाली पोलिस ठाण्यातील या चार पोलिस कर्मचार्‍यांनी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला असताना खातेबाह्य कृत्य केल्याची तक्रार पोलिस अधिक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे आली होती. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिस अधिक्षक शर्मा यांनी बर्डे, टकले, सय्यद आणि गवळी यांच्यावर भारतीय संविधानाचे कलम 311 प्रमाणे ही कारवाई केली आहे. केडगाव येथे शिवसेना पदाधिकार्‍यांची हत्या झाल्यानंतर अहमदनगर पोलिस अधिक्षक कार्यालयावर देखील हल्‍ला झाला होता. त्यावेळी कोतवाली पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचार्‍यांनी अशोभनीय तसेच खातेबाह्य कृत्य केले होते. केडगाव हत्याकांड या चार पोलिस कर्मचार्‍यांना चांगलेच भोवले आहे. केडगाव हत्याकांडानंतर कोतवाली पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यातील अविनाश बर्डे, रविंद्र टकले, समीर सय्यद आणि सुमीत गवळी यांना थेट बडतर्फ करण्यात आल्याने अहमदनगर पोलिस दलासह राज्य पोलिस दलात खळबळ उडाली आहे.