बंडखोरीमुळे महायुतीच्या ‘या’ 4 जागा धोक्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर चार ठिकाणी भाजप व शिवसेनेत बंडखोरी झाल्याचे उघड झाले असून त्यामुळे केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्यासह महायुतीच्या चार जागा अडचणीत आल्या आहेत.

धुळे महापालिका निवडणुकीत आमदार अनिल गोटे यांच्या आघाडीचा धुव्वा उडाला होता. त्यामुळे ते भाजपच्या पक्षश्रेष्ठीवर आणि केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराज होते. सुभाष भामरे यांच्या विरुद्ध लढण्याचे त्यांनी अगोदरच निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन धुळ्यातून अपक्ष म्हणून निवडणुक रिंगणात उतरले आहे. शुक्रवारी त्यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने डॉ. सुभाष भामरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नाशिकमध्ये भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे रिंगणात असून कोकाटेच्या उमेदवारीमुळे गोडसे अडचणीत आले आहेत. अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळविला आहे. त्यात दोन वेळा काँग्रेस आणि एकदा शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. सध्या त्यांच्यावर अपसंपदेचा आरोप असून त्याची चौकशी सुरु आहे. याबाबत कोकाटे यांनी सरकारने नोटीस बजावून ब्लॅकमेलिंग करीत असल्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे सांगितले.

शिर्डी मतदार संघात रामदास आठवले यांना आस्मान दाखविणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरुद्ध बंडखोरी केली आहे. वाकचौरे हे शिर्डी साई संस्थानाचे माजी कार्यकारी अधिकारी आहेत. २००९ मध्ये ते शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणुक लढविली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. श्रीरामपूर विधानसभा त्यांनी लढविली. पण तेथेही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. शिवसेना, काँग्रेस व त्यानंतर भाजपात आलेल्या वाकचौरे यांच्या उमेदवारीमुळे शिर्डीत आता काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे सदाशिव लोखंडे अशी तिरंगी लढत होणार आहे.

नंदूरबार येथून विद्यमान खासदार हिना गावीत यांच्याविरुद्ध भाजपचे डॉ. सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केली आहे. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा आवाज आपल्यासाठी महत्वाचा असून त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण रिंगणात उतरल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तिसऱ्या टप्प्यात भाजप व शिवसेना युती बंडखोरीमुळे किमान चार जागावर अडचणीत आली आहे.