‘या’ 4 नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या जप्तीच्या नोटिसा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे वेळेत न देणाऱ्या चार साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील हे चारही कारखाने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाशी संबंधित राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत.

सातारा जिल्हा हा खरं तर चांगल्या साखर उताऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अनेक साखर कारखान्यांच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांची देणी थकत गेली आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी या साखर कारखान्यांच्या जप्तीच्या नोटिसा काढल्या आहेत. त्यात अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या मालकीचा फलटण तालुक्यातील शरयु अग्रो इंडिया लिमिटेड साखर कारखाना, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभुराजे देसाई यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, सांगलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे भाऊ संग्राम देशमुख यांचा खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड आणि काँग्रेस नेते प्रल्हाद साळुंखे यांचा फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर्स लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एफआरपी रक्कम थकीत ठेवल्याप्रकरणी या कारखान्यांवर महसुल वसुली प्रमाणप्रत्रानुसार जप्तीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर व अन्य उत्पादित सामुग्री याची विक्री करुन थकीत रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

शरयु – १६ कोटी २३ लाख, लोकनेते बाळासाहेब देसाई २ कोटी ३३ लाख, ग्रीन पॉवर – ५ कोटी २ लाख, आणि न्यू फलटण शुगर्स – १ कोटी ३८ लाख अशी एकूण २४ कोटी ९६ लाख रुपयांची थकबाकी या कारखान्यांची आहे. महाराष्ट्रातील ८२ कारखान्यांना आतापर्यंत अशा प्रकारे आर आर सीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

या नोटिशीनंतर त्या कारखान्याला शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी १५ – १५ दिवसांची दोनदा मुदत दिली जाते. तरीही ऊसाचे पैसे न दिल्यास जिल्हाधिकारी स्थावर मालमत्ता विकून वसुलीची कारवाईही करु शकतात. अशाच प्रकारे अनेक कारखाने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी लिलावात काढून कोट्यवधीची जमीन असलेले कारखाने कवडीमोल किंमतीत लिलावात आपल्या नातेवाईकांच्या नावे विकत घेतले होते.

Visit – policenama.com 

 

You might also like