ISI एजंटसह 4 दहशतवादी घुसले, देशात सर्वत्र हाय ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हसेज इंटेलिजेंसच्या (आयएसआय) मदतीने चार दहशतवादी भारतात शिरले असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे राजस्थान, गुजरातसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळत आहे. या चार दहशतवाद्यांबरोबर आयएसआयच्या एका एजंटचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व दहशतवादी अफगाणी पासपोर्टच्या सहाय्याने भारतात शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी कोणत्याही क्षणी घातपात घडवू शकतात. यासाठी सर्व पोलिसांना सतर्क करण्यात आले असून सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची माहिती त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून संशयितांची कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पाकिस्तान तसेच दहशतवाद्यांकडून मोठा दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने गुप्तचर यंत्रणांनी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये या प्रकारच्या घातपाताच्या कारवाया मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर देशभरातील १५ मोठ्या शहरांमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला असून आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगण्यात येत आहे.

दरम्यान, हल्ल्याच्या दृष्टीने पोलीस सर्व ठिकाणी कसून चौकशी करत असून राज्य दहशतवादविरोधी पथक, शिघ्रकृती दल, फोर्स वन यांच्याकडून जागोजागी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like