महाराष्ट्रात स्त्रियांमधील एंडोमेट्रिओसिस प्रकरणांमध्ये 40% वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एंडोमेट्रीअम हे गर्भाशयाच्या आत असलेले आवरण आहे, जे मासिक पाळीतील रक्तस्रावात गळूण पडते. हे आवरण जेव्हा गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतं, तेव्हा त्याला एंडोमेट्रिऑसिस असं म्हणतात. यामुळे भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो. महाराष्ट्रात एंडोमेट्रिओसिसच्या घटनांमध्ये जवळजवळ 40% वाढ झाली आहे. जनजागृती अभावी दुर्दैवाने बर्‍याच महिलांना या रोगाचे निदान उशीराने होते परिणामी अनावश्यक त्रास आणि आयुष्याची गुणवत्ता कमी होते. रोगाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी वेळीच निदान होणे आवश्यक आहे.

गर्भाशयाच्या बाहेर एंडोमेट्रियल टिश्‍यू आल्यामुळे होणारी स्थिती आणि यामुळे खासकरून मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटामध्ये वेदना होतात.१५ ते ४९ या प्रजननक्षम वयोगटामध्ये यो रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे तसेच काही पर्यावरणीय घटक या आजाराला कारणीभूत ठरत आहेत. एंडोमेट्रिओसिस ग्रस्त स्त्रियाना बर्‍याचदा वेदनादायक संभोग, मासिक पाळी असह्य वेदना, चॉकलेट सिस्टची तक्रार सतावते. या आजाराचे निदान करण्यासाठी लेप्रोस्कोपी उपयुक्त ठरू शकते, ”डॉ. करिश्मा डाफळे, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांनी स्पष्ट केले.

पाळी येते तेव्हा रक्त आणि गर्भपिशवीतल्या आतलं आवरण जसं योनीमार्गातून बाहेर येतं तसं काही स्त्रियांमध्ये स्राव जास्त असल्यास गर्भनलिकेतून पोटात रक्त पडतं. असं हे रक्त आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या पेशी या पोटाच्या आतल्या अवयवांवर जाऊन चिकटतात. मुख्यत्वे करून अशा बीजांडामध्ये रक्ताच्या सिस्ट (cyst) होतात. ज्याला चॉकलेट सिस्ट (cyst) असंही म्हटलं जातं. वेळीच उपचार न केल्यास किंवा निदान न झाल्यास चॉकलेट सिस्ट गंभीर परिणाम करू शकते किंवा ते फुटणे, वंध्यत्व, गर्भाशयाची सूज आणि तीव्र वेदना अशी गंभीर गुंतागुंत निर्माण करु शकते. चॉकलेट सिस्ट (अंडाशयाभोवती आढळणार्‍या गर्भाशयाच्या अस्तराच्या गाठी) आणि गर्भाशयाचा अ‍ॅडिनोमायोसिस निदान सोनोग्राफी आणि कलर डॉपलरच्या माध्यमातून होऊ शकते. एण्डोमेट्रिऑसिसच्या अन्य सर्व जखमांचे निदान एमआरआयच्या माध्यमातून होते.

एण्डोमेट्रिऑसिसचे निदान व त्यावर उपचार करण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे लॅपरोस्कोपी. एंडोमेट्रिओसिस ग्रस्त असलेल्या स्त्रिया नैसर्गिकरित्या तसेच काही पुनरुत्पादक सहाय्याने गर्भधारणा करू शकतात. एण्डोमेट्रिऑसिसचे निदान झालेल्या स्त्रियांनी वर्षातून एकदा अल्ट्रासाऊंड तपासणी करून घ्यावी. अंडाशयाभोवतीच्या गाठी यामुळे लक्षात येतात. मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी रक्ताची तपासणी केल्यास ओव्हरियन रिझर्व्ह (अंडाशयाभोवतीचे घटक) किती आहे हे समजते. एण्डोमेट्रिऑसिसचा त्रास होणार्‍या स्त्रियांमध्ये ओव्हरियन रिझर्व्हचे प्रमाण घटलेले असते. गर्भाशयाच्या अस्तराच्या मोठ्या गाठी आढळल्यास त्या स्त्रियांवर शस्त्रक्रियात्मक उपचार सुरू केले पाहिजेत. स्त्रियांनी लवकरात लवकर मुल होऊ द्यावे यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि मुल लवकर नको असेल, तर त्यांना हार्मोनल उपचार दिले पाहिजेत.