‘देशद्रोह, चौकीदार’ या शब्दांवर निवडणुकीचा शिमगा सुरू : खा. संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक नेते आणि मतदार लढत नसून सर्वच पक्षातले अंध भक्त लढत आहेत. एकमेकांविषयीचा द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व याआधी कोणत्याच निवडणुकीत पाहिले नाही. इंदिरा गांधी यांच्या विरोधात आणीबाणीनंतर विऱोधक एकवटले होते ती त्यांची वैचारिक लढाई होती. परंतु इंदिरा गांधी यांच्याविषयी द्वेष नव्हता. आता देशद्रोह हा एक सोपा आणि परवलीचा शब्द झाला आहे. कोणीही या शब्दाचा वापर करत आहे. या निवडणुकीत पुलवामा हल्ला, राफेल हे मुद्दे बाजूला पडले असून देशद्रोह, चौकीदार या शब्दांवर निवडणुकीचा शिमगा सुरु असल्याचे रोखठोक मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

पुलवामा हल्ल्याबाबत सपाचे नेते राम गोपाल यांनी सरकारवर शंका व्यक्त केली होती. यादव यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. एकेकाळी मिसा, टाडा, पोटा, तडीपारीचा वापर राजकारण्यांवर होत होता. मात्र आता देशद्रोहाचे आरोप व गुन्हे यांनी त्यांची जागा घेतली आहे. देशद्रोही शब्दाचे महत्त्व आणि भीती संपली आहे. देशातील ४० ते ४५ टक्के जनता आशाने देशद्रोही ठरेल. कारण हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या सरकारविरुद्ध मतदान करीत असतात.

देशभक्ती व देशसेवेची पातळी घसरली असून हे देशद्रोहापेक्षा गंभीर आहे. लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तच इरेला पेटले आहेत. ‘देशद्रोह’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांची नवी व्याख्या या निवडणुकीत ठरत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत देशात कुणाचीही एकाधिकारशाही राहू नये म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रबळ विरोधी पक्ष निर्माण व्हावा. विरोधी पक्षनेत्यांची मुस्कटदाबी सुरू होते तेव्हा संविधान व लोकशाहीची हत्या होते असंही राऊत यांनी सांगितलं.

Loading...
You might also like