शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाला 400 कोटींचा निधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ४०० कोटीं रुपयांच्या खर्चास देण्यास मान्यता देण्यात आली. मुंबईतील महापौर निवासस्थान परिसरातील जागेवर हे स्मारक होणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

या प्रकल्पाच्या कामाच्या प्राधान्यानुसार टप्पा- १ व २ स्वरूपात स्मारकाचे काम हाती घेण्यात येणार आहे. टप्पा-१ मध्ये २५० तर टप्पा-२ मध्ये १५० कोटी रुपये असे ४०० कोटी अंदाजित खर्च निश्चित केला आहे. टप्पा १ मध्ये सर्व इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, यामध्ये स्थापत्य, विद्युत, इमारतीच्या अंतर्गत व बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे करण्यात येणार आहे. तर टप्पा-2 मध्ये तंत्रज्ञान, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे. चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी इत्यादी कामे इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना हाती घ्यावयाचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ४०० कोटी रकमेचा खर्च सुरुवातीस करणार आहे.

पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि घटक महाविद्यालयांतील शिक्षकांना १ जानेवारी २०१६ कालावधीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. याचा ३८८ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार् यांना लाभ होईल. यासाठी ३० कोटी रुपये एवढा निधी देण्यात येईल. तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ५० विद्यार्थी क्षमता असलेल्या शासकीय परिचर्या महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली असून यासाठी १६ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रशासकांना मुदतवाढ

कोरोनामुळे अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु पुन्हा कोरोनाचे सावट गडद होत आहे. त्यामुळे प्रशासकांना मुदतवाढ देण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार सरकारने या प्रशासकांना आता ३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

बालसंगोपन योजनेच्या अनुदानात वाढ

बालसंगोपन योजने अंतर्गत बालकांचे संगोपन करणाऱ्या पालकांना प्रति बालक दरमहा काही अनुदान देण्यात येत होते. आता या अनुदानात वाढ करण्यात आली असून ४२५ वरून ११०० रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे.