सांगलीतील जुन्या वटवृक्षाला वाचवण्यात यश, आदित्य ठाकरेंकडून नितीन गडकरींचे ‘आभार’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामांमध्ये तोडला भोसे गावाजवळील 400 वर्ष जुन्या वटवृक्षा प्रकरणी महत्त्वपूर्ण तोडगा निघाला आहे. या हायवेच्या सर्व्हिस रोडसाठी पर्याय काढून 400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. महामार्गाची रचना थोडीशी बदलून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेतला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी तात्काळ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. अखेर काल नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून भोसेच्या वटवृक्षप्रकरणी मार्ग काढण्याचे आदेश एनएचएआयच्या अधिकार्‍यांना प्राप्त झाले. त्यानंतर ठाकरे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. एनएचएआयच्या अधिकार्‍यांनी इथे भेट देऊन 400 वर्ष जुन्या वटवृक्षाची पाहणी केली असे मला समजले आहे.

त्यानंतर महामार्गावरील बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हे वृक्ष वाचले आहे. माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी आभार मानतो. ज्यांनी हा मुद्दा निदर्शनास आणला आणि हे वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचेही ही आभार मानतो, असे आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.