रशियात विमानाला आग लागून ४१ जणांचा मृत्यू

मॉस्को : वृत्तसंस्था – रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये एमर्जन्सी लँडिंग करताना सुखोई सुपरजेट १०० या विमानाला आग लावून त्यात ४१ जणांचा मृत्यु झाला. मॉस्को विमानतळावर ही घटना रविवारी घडली.

मॉस्को विमानतळावरुन सुखोई प्रवासी विमानाने उत्तर रशियातील म्युरमॅनस्कला जाण्यासाठी उड्डाण केले. या विमानामध्ये ७३ प्रवासी आणि ५ कर्मचार होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानातून धूर निघू लागला. हे पाहून वैमानिकाने तातडीने याची माहिती विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर विमानाने एमर्जन्सी लँडिंग केले. विमान उतरत असतानाच त्याने पेट घेतला. दूर्घटनेच्यावेळी विमानात ७८ जण होते. विमानाचे लँडिंग होईपर्यंत त्याचा जवळपास निम्मा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यावेळी अनेक प्रवाशांना एमर्जन्सी स्लाईड्सच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यातील ४१ प्रवाशांचा मृत्यु झाला.

सोशल मिडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात विमानाला लागलेली भीषण आग दिसून येत आहे. विमान उतरत असताना मागचा भाग पूर्णपणे जळत असल्याचे दिसते. हे विमान दोन वर्षे जुने होते. विमानाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.