राज्यातील 42 मंत्र्यांपैकी 41 करोडपती, काँग्रेस नेत्यांकडे ‘एवढ्या’ कोटींची ‘मालमत्ता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्ता स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारने अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार करत खातेवाटप जाहीर केले आहे, मात्र असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संपत्तीबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांपैकी 41 मंत्री हे कोट्याधीश असून त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 21.9 कोटी रुपये इतके आहे. या रिपोर्टमध्ये इतर माहितीच्या व्यतिरिक्त, मंत्र्यांच्या आर्थिक सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतही माहिती देण्यात आली आहे. त्यात काँग्रेसचे विश्वजीत कदम हे सर्वात धनाढ्य मंत्री असून त्यांची संपत्ती 216 कोटी इतकी असल्याचे समजते आहे.

मख्यमंत्र्यांबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही :

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2014 च्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या तुलनेत यंदाच्या मंत्रिमंडळातील 82 टक्के मंत्र्यांची संपत्ती करोडोत आहे. यातील तीन मंत्री सर्वाधिक श्रीमंत असून काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचे स्थान अव्वल आहे. विश्वजीत कदम यांच्याकडे 216 कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानावे 75 कोटींची संपत्ती आहे. त्यांनतर राष्ट्रवादीचेच नेते राजेश टोपे यांच्याकडे 53 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यादरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेचा खुलासा होऊ शकला नाही. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढल्याने त्यांच्या मालमत्तेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समजते. सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यमंत्री अदिती तटकरे या एकमेव आमदार आहेत ज्या कोट्याधीश नाहीत. यांच्याकडे 39 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये मंत्र्याच्या वार्षिक उत्पन्नाबाबतही माहिती देण्यात आली असून अजित पवार यांचे वार्षिक उत्पन्न 3 कोटी 86 लाख आहे. अमित देशमुख यांचे 3 कोटी 26 लाख तर विश्वजीत कदम यांचे 2 कोटी 35 लाख रुपये उत्पन्न आहे. सोबतच 42 मंत्र्यांपैकी 37 मंत्र्यांवरील कर्जही जाहीर केले आहेत. यापैकी विश्वजीत कदम यांच्यावर सर्वाधिक 121 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यावर 37 कोटी तर विजय वडेट्टीवार यांच्यावर 22 कोटी रुपये कर्ज आहे.

असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्मच्या रिपोर्टमध्ये एकूण 18 मंत्र्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता जाहीर केली आहे. जी वर्ग आठवी ते बारावी पर्यंत आहे. तर 22 मंत्री पदवीधर आहेत. तसेच 17 मंत्र्यांचे वय 25 आणि 50 च्या दरम्यान आहे. तर 25 मंत्री 51 ते 80 वयाच्या दरम्यान आहेत. दरम्यान, महत्वाचे म्हणजे या मंत्रिमंडळात 27 मंत्र्यांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपाचे खटले दाखल आहेत. तर 18 मंत्र्यांविरुद्ध गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/