उत्तरप्रदेश अन् बिहारमध्ये वीज कोसळून एकाच दिवसात 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वीज कोसळल्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शनिवारी (दि. ४) रोजी एकाच दिवशी ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील काही परिसरात पाऊस झाला होता. मात्र, वीज कोसळल्याने २३ जणांचा मृत्यू झाला असून, २९ जण होरपळले आहेत. तर बिहारमध्ये वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेश राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात प्रयागराजमध्ये आठ, मिर्जापूरमध्ये सहा, भिदोईत सहा, कौशिंबीमध्ये दोन तर जौनपूरमध्ये एकाच मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये भोजपूर ९, सारण ५, कैमूर ३, पटना २ तर बक्सरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

पटना हवामान विभागाने पुढील ४८ तासांमध्ये, राज्यात अनेक ठिकाणी पावसासह वीज कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी शेतात जाण्यास मनाई केली आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ६ जुलै पर्यंत ऑरेंज आणि ब्लु अलर्ट जारी करण्यात आला असून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

बिहारमध्ये याआधी २५ जून रोजी वीज कोसळून तब्बल ८३ जणांचा मृत्यू झाला होता. तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा वीज कोसळून यापूर्वी २४ जणांचा बळी गेला आहे. पटना, मुजफ्फरपूर, भोजपुर, बक्सरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे येथील काही भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.