Solapur News : धक्कादायक ! 43 दिव्यांग विद्यार्थ्यांसह 8 शिक्षकांना ‘कोरोना’ची लागण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत 43 विद्यार्थी आणि 8 शिक्षक अशा एकूण 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावात दिव्यांग विद्यार्थ्यांची जिव्हाळा शेतकी कर्मशाळा आहे. या शाळेत 20 वर्षांच्या पुढील दिव्यांग मुलांना शेती तसेच अन्य प्रशिक्षण दिले जाते. शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरानाची बाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांसह 8 शिक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. संस्थेचे प्रमुख अण्णाराव राजमाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. कोरोनाबाधित विद्यार्थी व शिक्षकांची नियमित तपासणी आणि औषधोपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

12 फेब्रुवारीला शाळेतील काही शिक्षकांना त्रास होऊ लागल्यानंतर संपूर्ण शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यावेळी प्रथम सहा जण कोरोना बाधित आढळले. यानंतर आणखी काही जणांची पुन्हा तपासणी केली. तेंव्हा ही संख्या दुपटीने वाढली. सर्व विद्यार्थ्यांवर शाळा परिसरात उपचार सुरू आहेत. अंत्रोळी आणि कंदलगावमध्ये 50 एकरावर ही जिव्हाळा शेतकी कर्मशाळा उभारण्यात आली आहे.