मसूदच्या भावासह ४४ दहशतवाद्यांना अटक, पाकिस्तानची कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश -ए -मोहम्मदाचा म्होरक्या मौलाना मसूद अझर याच्या भावासह तब्बल ४४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या भावांसह एकूण ४४ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, ही कारवाई कुणाच्याही दबावाखाली येऊन करण्यात आलेली नाही, असा दावा पाकिस्तानचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी केला आहे.आफ्रिदी यांनी म्हंटले आहे की ”पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई ही कुणाच्याही दबावाखाली येऊन घेतलेली नाही. ही कारवाई सर्व प्रतिबंधीत दहशतवादी संघटनांविरोधात करण्यात आली आहे.”

पाकिस्तान सरकारच्या पत्रकानुसार, “नॅशनल अक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी ४ मार्चला अंतर्गत सुरक्षा मंत्रालयात एक बैठक पार पडली. ज्यात राज्य सरकारमधील सगळ्या प्रतिनिधींची हजेरी होती. या बैठकीत कट्टरवादाचा आरोप असलेल्या संघटनांविरोधात वेगानं कारवाई करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानुसार ४४ जणांवर अंतर्गत सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन होते. त्यातील अझहर मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हमद अझहर या दोघांसहित ४४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येईल. नॅशनल सिक्युरिटी कमिटीत घेतलेल्या निर्णयानुसार या प्रकरणी कारवाई करण्यात येईल.”