‘तोक्ते’चे गुजरातमध्ये रौद्ररुप; 12 जिल्ह्यांत आत्तापर्यंत 45 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – ‘तोक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी धडकले होते. त्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. पण आता हे वादळ गुजरातमध्ये धडकले आहे.

गुजरातमध्ये तोक्ते या चक्रीवादळामुळे 45 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रभाव सौराष्ट्रात झाला. त्यात 15 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील आपत्ती अभियान केंद्राच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भावनगर आणि गिर सोमनाथ तटीय जिल्ह्यांत 8-8 लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादेत पाच, खेडामध्ये दोन, आनंद, वडोदरा, सूरत, वलसाड, राजकोट, नवसारी आणि पंचमहल जिल्ह्यांतील एक-एक व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच त्यांनी सांगितले की, 24 लोकांचा मृत्यू चक्रीवादळामुळे भिंतीची पडझड झाल्याने झाला. तर सहा लोकांचा मृत्यू त्यांच्यावर झाड कोसळल्याने झाला. पाच-पाच लोकांचा मृत्यू शॉक आणि घराच्या पडझडीमुळे झाला. याशिवाय चार लोकांचा मृत्यू छत कोसळल्याने आणि एका व्यक्तीचा मृत्यू टॉवर पडल्याने झाला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोक्ते चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी गुजरात आणि केंद्रशासित दीवच्या प्रभावित भागांची हवाई पाहणी केली. तसेच त्यांनी एक दिवसीय गुजरातचा दौरा केला. त्यानंतर आज ते भावनगर पोहोचले. तिथे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्यांचे स्वागत केले.