तीन वर्षांत ४६ लाख ३० हजार ‘फॉलोअर्स’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – समाजमाध्यमांवरून अफवेला पाय फुटतात. चुकीची, अर्धवट माहिती त्वरित पसरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. अशा परिस्थितीत ‘काट्याने काटा’ या तत्त्वाचा आधार घेत पोलीस आपले ट्विटर हॅण्डल वापरत आहेत. एका ट्विटद्वारे नेमकी वस्तुस्थिती, अधिकृत माहिती लाखोंपर्यंत पाहोचवणे शक्य झाले. पुढे हाच मजकूर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून आणखी सर्वदूर पसरवून विरोध, संतापाची तीव्रता कमी करण्यात यश आले, असे पोलिस सांगतात.

संपांची माहिती देण्यापासून ते अफवांना आळा घालण्यापर्यंत अनेक बाबी सहज हाताळण्याच्या दृष्टीने ट्विटर हे सध्या मुंबई पोलिसांच्या खात्यातील प्रभावी अस्त्र ठरत आहे. जनजागृती, सूचना-बदलांची माहिती, मदत-सहकार्य, तक्रारींची दखल अशा अनेक कारणांसाठी मुंबई पोलीस ट्विटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी संवाद साधत आहेत. देशातल्या इतर कोणत्याही पोलीस दलापेक्षा मुंबई पोलीस ट्विटरचा प्रभावी वापर करत असल्याने तब्बल ४६ लाख ३० हजार ‘फॉलोअर’ जोडले गेले आहेत.

राकेश मारिया यांनी पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळात मुंबई पोलीस दलाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तेव्हा एका व्यक्तीने ‘मुंबई पोलीस’ या नावे ट्विटरवर खाते सुरू केले होते. हे नाव मिळवण्यासाठी पोलीस दलाला केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा करावा लागला.

राकेश मारिया यांच्यानंतर आयुक्तपदी आलेल्या अहमद जावेद यांच्या कार्यकाळात मुंबई पोलीस दलाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल कार्यान्वित झाले. तर दत्ता पडसलगीकर यांच्या कार्यकाळात पोलीस दलासाठी प्रभावी शस्त्र म्हणून ट्विटरचा वापर सुरू झाला. गेल्या तीन वर्षांत या ट्विटर हँडलने जमवलेल्या पाठिराख्यांची संख्या लक्षणीय आहे.

या समाजमाध्यमाद्वारे विचार करण्यास भाग पाडेल, अशी कल्पक जनजागृती केली जात आहे. आलेल्या प्रत्येक तक्रारीची अवघ्या काही सेकंदांत दखल घेऊन केली जाणारी कृती, शंकांचे निरसन यामुळे मिळालेल्या यशात तत्कालीन आयुक्तांसह सहआयुक्त देवेन भारती, ट्विटर हाताळणाऱ्या पथकाचे मोलाचे योगदान आहे. ट्विटर हॅण्डल २४ तास हाताळले जाते. त्यासाठी ३० जणांचे पथक दोन पाळ्यांमध्ये कार्यरत आहे. त्यात पोलिसांसह पत्रकार, ग्राफिक डिझायनरही आहेत.

बेस्टच्या संपाबाबत पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या शहरवासीयांना सोमवारीच सतर्क केले. नववर्षांच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांनी केलेले नियोजन, बदलांच्या सूचना मुंबईकरांना उपयुक्त ठरल्या. गर्दीच्या वेळेत एखाद्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यास पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला पोलीस ट्विटद्वारे देतात.

व्यसनमुक्ती, हेल्मेटवापर, सीटबेल्ट बांधणे, वाहतुकीचे अन्य नियम, लाचखोरी इत्यादींसंदर्भाद जनजागृती केली जाते. चोरीपासून बलात्कारापर्यंत कोणताही प्रसंग ओढवल्यास पुढे येऊन तक्रार करा, अपघात किंवा अनुचित प्रसंग घडताना दिसल्यास त्याचे चित्रीकरणक करत बसण्यापेक्षा पोलिसांना कळवा, डेबिट-क्रेडिट कार्डचे तपशील मागणारा दूरध्वनी भामटय़ाचाच अशा विविध विषयांवर मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेले कल्पक संदेश (पोस्ट) चर्चेचा विषय ठरत आहेत.

गणेशोत्सवाची सजावट आणि त्याला खेटून रमझानच्या महिन्यात उभारण्यात आलेली पाणपोई हे पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरील छायाचित्र सर्वाधिक लोकप्रिय ठरले. अर्ज देऊन, चार खेपा घालून जे शक्य होत नाही ते एका ट्विटमुळे होत असल्याचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. आघाडीच्या उद्योगसमूहाच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षिकेने सहकारी शिक्षकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्याकडून चौकशीत टाळाटाळ होत होती. शिक्षिकेने ट्वीट करून ही व्यथा मांडली आणि त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला.

ट्विटरवर आलेल्या तक्रारीचे स्वरूप पाहून तक्रारदाराला संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा संपर्क क्रमांक दिला जातो. तक्रार गंभीर असल्यास संबंधित वरिष्ठ निरीक्षकाला तक्रारदाराची माहिती पुरवली जाते. त्यानुसार पोलीस अधिकारी तक्रारदाराशी संपर्क साधून तक्रार दूर करतो. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर महापालिकेसह अन्य विभागांशी संबंधित तक्रारीही येतात. तक्रारदाराला संबंधित विभागाचे संपर्क क्रमांक दिले जातात. अनेकदा ट्विटर हाताळणारे पथकच तक्रारदाराच्या वतीने अन्य विभागांमध्ये तक्रार करते आणि क्रमांक तक्रारदाराला देऊन पाठपुरावा करण्यास सांगते.

सूचना, बदल एकाच वेळी लाखो नागरिकांना कळवण्यासाठी, जनजागृतीसाठी ट्विटर प्रभावी माध्यम आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटना याद्वारे चटकन समजतात. पोलीस आणि नागरिकांत संवाद घडतो. तक्रारी दूर झाल्याने पोलिसांवरील विश्वास वृद्धिंगत होत आहे. हे मुंबई पोलीस दलाच्या ट्विटर हॅण्डलचे यश आहे.