47 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी केला मूळ मालकांना परत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात घडलेल्या गुन्ह्यात हस्तगत केलेला 47 लाखांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आला. पोलीस आयुक्तालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, आर.आर. पाटील, संजय नाईक पाटील, पोलीस निरीक्षक आणि 28 फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले, नागरिकांच्या चेहऱ्यावर आलेले समाधान आम्हाला काम करण्यास प्रेरणा देते. गुन्हे कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. संशयित ठिकाणी जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. त्यासाठी पोलिसांनी विविध संस्थांच्या मदतीने यासाठी पुढाकार घ्यावा. कोट्यवधीच्या संपत्तीसाठी एखादा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची तसदी देखील काही लोक घेत नाहीत. ही खेदाची बाब आहे.

तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षा अबाधित करणे गरजेचे आहे. स्वतःच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गुंतवणूक करावी. डिटेक्शनवर पोलिसांनी जोर द्यावा. त्यात टीमवर्क केल्यास यश मिळेल. गुन्हे वाढण्याचे ऐकायला वारंवार मिळते, पण त्याबाबत खबरदारी किती नागरिक घेतात हे मात्र, ऐकायला मिळत नाही. गुन्हे दाखल होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसते, पण योग्य डिटेक्शन झाले तर यावर अंमल आणता येईल. सर्व अधिका-यांनी यावर काम करावे. दर तीन महिन्यांनी रिकव्हर केलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम होईल, असेही बिष्णोई म्हणाले. सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी केले. प्रास्ताविक पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी तर सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/