बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्यानं 48 लाखांना गंडा, 22 जणांचा फसवणूक केल्याप्रकरणी FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यात व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने 22 जणांची तब्बल 48 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुसज्ज ऑफिस थाटात या भामट्यानी नागरिकांना फसविले आणि नंतर हे ऑफिस बंद करुन पसार झाले. जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी 37 वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिष शहा, अमित शर्मा आणि दिलीप मोदी (सर्व रा. एम आय टी, कोथरुड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघा आरोपींनी कर्वे रोडवरील गणेश चेंबरमध्ये सिटी वेंचर बिझ व बालाजी असोएिशयटस या नावाने कंपनी जानेवारी २०२० मध्ये उघडली. त्यांचे ऑफिस येथे सुरू केले. तसेच ६ टक्के कमी व्याजाने पैसे देण्यात येईल. तर 1 कोटीपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार नागरिकांचा विश्वास संपादन केला. मात्र नागरिकांना या कर्ज प्रकरणासाठी लागणारे प्रोसेसिंगनिमित्त पैसे देण्यास सांगितले.

अनेकांना पैशांची आवश्यकता असल्याने नागरिक या आरोपींच्या बहाण्याला बळी पडले आणि त्यांनी पैसे दिले. मात्र, या नागरिकांना कर्ज मिळालेच नाही.

त्यानंतर देखील या आरोपींनी आणखी एक योजना असल्याचे सांगत त्यात गुंतवणुक करायला सांगितले. एका कार घेऊन ती कंपनीकडे ठेवायची. तिचे २ लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचे बाकी पैसे कंपनी भरले व त्यांना महिना ५० हजार रुपये मिळतील असे सांगितले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादी आणि इतरांनी पैसे भरले.

परंतु, या नागरिकांना, कर्ज किंवा २ लाख रुपये डाऊन पेंमेंट भरले तरी गाडी तसेच त्याबदल्यात महिना ५० हजार रुपयेही असे काहीच मिळाले नाही. त्यावेळी त्यांच्यावर संशय आला. मात्र तोपर्यंत आरोपी सुरू केलेले ऑफिस बंदकरून पसार झाले. नागरिकांचा संपर्क झाल्यानंतर ते वेगवेगळे कारण देत. त्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्याने त्यांनी थेट आता ऑफिस उघडता येणार नाही, असे सांगण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या नागरिकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विठ्ठल झाजुर्ण करीत आहेत़