शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भाजपकडून 49 इच्छुक ! शहकटशाहचे राजकारण सुरू

बॅनरबाजीतून अंतर्गत स्पर्धकाला संदेश पोचविण्याचा खटाटोप वाढला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असलेल्या भाजपमध्ये आता तिकीटासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: शिवाजीनगर मतदारसंघामध्ये इच्छूकांची संख्या जवळपास पन्नासवर गेली आहे, या मतदारसंघातील डेक्कन परिसरातील नगरसेवक असलेल्या एका इच्छुकांने तर औंधरोड खडकी, बोपोडीसारख्या परिसरात पहिल्यांदाच महापालिकेच्यावतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिचषक हॉकी स्पर्धेचे फलक उभारत, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका इच्छुकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

भाजपच्या नेत्यांनी नुकतेच शहरातील आठही मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजय काळे यांच्यावरील नाराजीमुळे या मतदारसंघातून तब्बल ४९ इच्छूकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. परंतू प्रामुख्याने माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव व विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक दत्ता खाडे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि खडकी औंधरोड येथे राहाणारे पत्रकार सुनिल माने हे देखिल उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जात असून अंतिम उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत तशी अनिश्‍चितता आहे.

दरम्यान, इच्छुकांनी आतापासूनच मतदारसंघ ढवळून काढायला सुरूवात केली आहे. नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांनी महापालिकेच्यावतीने डॉ. आंबेडकर स्मृतिचषक हॉकी स्पर्धेचे निमित्त साधून मतदारसंघातील विशेषत: औंध रोड, खडकी परिसरात स्पर्धेसाठी शुभेच्छापर बॅनर लावले आहेत. या परिसरात डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांची संख्या मोठी असून स्वत: सुनिल माने बौध्द समाजाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांना माननारा मोठा वर्ग आहे. या ठिकाणी लावलेल्या बॅनरवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र वापरून निळ्या रंगाच्या छटा आहेत.

अनिल शिरोळे हे खासदार असताना देखिल या परिसरात कधीही त्यांनी बॅनर लावले नाहीत. किंबहुना सिद्धार्थ शिरोळे यांचेही या परिसरात कधी बॅनर लागले नाहीत किंवा त्यांच्यासाठी अन्य कोणी लावले असले तरी त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो दिसले नाहीत. परंतू माने यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मागितल्याने शिरोळे यांनी प्रथमच बॅनरबाजी आणि डॉ. आंबेडकरांच्या छबीचा वापर करून माने यांना शह दिल्याची चर्चा, या परिसरात रंगली आहे. या अंतर्गत स्पर्धेमुळे निवडणुकीचे राजकारण तापत असल्याचे पाहायला मिळत असले तरी पक्षश्रेष्ठीच उमेदवारी अंतिम करणार असल्याने बॅनरबाजीचा फारसा उपयोग होणार नाही, असाही एक सूर येथील चर्चेतून उमटत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –