कोयत्याने वार करुन लुटमार करणारे ५ जण गजाआड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कोयत्याने वार करुन लुटमारीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी/दरोडा प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. बुधवारी (२३ एप्रिल) नाशिकफाटा येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

संदिप एकनाथ शिंदे (१९, रा. दिघी), गौतम हरीदास माने (४०, रा. औंध), भुषण दिनेश गायकवाड (२०, रा.ताडीवालारोड, पुणे), निलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेडगे (२०, रा. कोरेगावपार्क, पुणे) सुशिल अच्युतराव सुर्यवंशी (२४, रा. ताडीवाला रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रदिप गायकवाड यांनी फिर्याद दिली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे फॉरेन करन्सी एक्सेंज या ठिकाणी काम करतात. त्यांना आरोपींनी फोनवर टाटा मोटर्स कंपनी येथून बोलत असल्याचे सांगून १२ ते १५ हजार डॉलर बदलून हवे आहेत अशी मागणी केली. त्यानुसार गायकवाड आणि त्यांचे सहकारी मोहन अडागळे हे चलन बदलून देण्यासाठी भोसरीकडून केएसबी चौकाकडे जात होते. दरम्यान, भोसरीतील टाटा मोटर्स पार्किंगजवळ दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्याकडे असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचे सहकारी अडागळे यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्या हातावर कोयत्याने वार केले, तरी देखील अडागळे यांनी बॅग सोडली नाही.

अडागळे यांनी आरडा-ओरडा केल्याने आरोपींनी अडागळे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून त्या ठिकाणाहून पळ काढला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस नाईक किरण काटकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून आरोपी नाशिक फाटा येथील सार्वजनीक पार्कींग मध्ये येणार असल्याचे समजले. त्यावरून फौजदार विठ्ठल बढे, कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवणे, किरण काटकर, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगम, आशिष बोटके, सागर शेडगे, सुधीर डोळस व प्रदिप गोडांबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.  गुन्ह्यात वापरलेला मोबाईल, दुचाकी असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.