राज्यातील ५ भाजप खासदार धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खासदारांची एक यादी तयार केली आहे. या यादीत संसदेच्या ४५ खासदारांची नावे असून, त्यात महाराष्ट्रातील ५ भाजप खासदारांचाही समावेश आहे.

हरियाणामध्ये १४ जून आणि १६ जूनला बैठक झाली. या बैठकीत संघाचे महासचिव भय्याजी जोशी, संघाचे संयुक्त सचिव दत्तात्रय होसबळे आणि कृष्णा गोपाल आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चासुद्धा झाली. त्यात काही खासदारांची नावेही काढण्यात आली आहे. संघाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्व्हेतून या खासदारांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे भाजपाने आतापासूनच सावध पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे.

देशभरातील ४५ खासदारांचे सीट डेंझर झोनमध्ये असल्याचे या सर्व्हेमधून पुढे आले आहे. त्यातील अनेक खासदार हे २०१४ याच्या निवडणुकीअगोदर भाजपमध्ये येऊन मोदी लाटेत खासदार झालेले आहेत. त्यांचा पक्षाशी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी फारसा संबंध यापूर्वी आलेला नव्हता. गेल्या चार वर्षात त्यांनी आरएसएसशी संबंध वाढविण्याच्या दृष्टीने फारसा प्रयत्नही केला नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

खराब कामगिरी, कार्यकर्त्यांशी असलेले मतभेद अशा निकषांच्या आधारे संघाने अशा खासदारांची ही यादी तयार केली आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, लातूरचे खासदार सुनील गायकवाड, सांगलीचे संजय काका पाटील यांचा यादीत समावेश आहे.

संघानं जाहीर केलेल्या यादीतल्या महाराष्ट्रातील या खासदारांच्या विरोधात भाजपामध्ये नाराजीचे वातावरण आहे. संजय काका पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपामध्ये येऊन खासदार झाले आहेत. तर शरद बनसोडे यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये येऊन खासदारकी मिळवली आहे.