बँकेचा आठवडा ५ दिवसांचा ? काय आहे नेमके सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात आणि व्हाट्सअ‍ॅप वर बँकांच्या ५ दिवसांच्या आठ्वड्याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. परंतु यासंदर्भात असा कोणताही निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेतला गेला नाहीये आणि असा कोणताही आदेश बँकांना दिला गेला नसल्याचे रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्द झालेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
Bank

यासंर्भात सविस्तर बातमी अशी की, बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून सातत्याने पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून अशा प्रकारचा निर्णय झाल्याच्या अफवा सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. परंतु रिझर्व्ह बँकेने याआधीच आपली भूमिका जाहीर केली असून, पाच दिवसांचा आठवडा करण्याचा कोणताही आदेश जारी केला नसल्याचे स्पष्ट केलेले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज :
‘बँकांचे कामकाज आठवड्यातील पाच दिवस करण्याच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बँकांना आता 1 जूनपासून प्रत्येक शनिवारी सुट्टी असणार आहे. तसेच, बँकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सकाळी साडे आठ ते संध्याकाळी साडे सहा पर्यंत बँकांचे कामकाज असणार आहे’, असा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दयाल यांच्या प्रसिद्धीपत्रकातील मजकूर :
‘सोशल मीडियात सातत्याने बँका आठवड्यात पाच दिवस कार्यरत राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे वृत्त खरे नाही. बँका दरमहा केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बंद राहतील. तसेच, रिझर्व्ह बँकेकडून यासंबंधी कोणताही आदेश काढण्यात आला नाही’