सरकारच्या 5 दिवसांच्या ‘आठवड्या’ला हायकोर्टात ‘आव्हान’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील आघाडी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्या म्हणजेच शनिवारपासून (दि.29) होणार आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेऊन त्याबाबतचे परिपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आले. त्यामुळे केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवार आणि रविवार सुट्टी राहणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी (दि.2 मार्च) या जनहित याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मनोज गाडेकर यांनी ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. लोकप्रियतेसाठी नोकरदारांसाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. केंद्राप्रमाणे राज्यातली सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार सुट्टी राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होईल, त्यामुळे उद्या पाचवा शनिवार असल्याने उद्या शासकिय कार्यालयांना सुट्टी असणार आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालय, पोलीस दलातील कर्मचारी यांना मात्र सुट्टी राहणार नाही. यापूर्वी दुसरा आणि चौथ्या शनिवारी शासकिय कार्यालये बंद ठेवण्यात येत होती. आता येथून पुढे दर शनिवार आणि रविवार शासकिय कार्यालयांना सुट्टी राहणार आहे. शासकिय कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी त्यांच्या कामाची वेळ वाढवण्यात आली आहे. शासकिय कार्यालये सकाळी 9.45 ते 6.15 वेळेत सुरू राहणार आहेत.