भोसरीत ५ लाखाचा गुटखा जप्त, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन कार आणि गुटखा असा एकूण ४ लाख ८७ हजार १२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.७) दुपारी तीनच्या सुमारास भोसरी येथील शांतीनगरमधील सार्वजनीक रोडवर करण्यात आली.

सागर बालाजी वराळे (वय-२४ रा. शांतीनगर, भोसरी), श्रवण मोहनलाल चौधरी (वय-३४ रा. चपरा, ता. देसुरी, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक भोसरी परिसरात गस्त घाल असताना पथकातील पोलीस हवालदार राजन महाडीक यांना शांतीनगर मधील सार्वजनीक रस्त्यावर दोनजण संशयितरित्या उभे असून त्यांच्याकडे गुटखा असल्याची माहित मिळाली. पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला असता दोनजण संशयितरित्या आढळून आले. त्यांच्याकडे असलेल्या नॅनो कार (एमएच १२ जेसी ७७८३) आणि सॅन्ट्रो (एमएच १२ एचएल २८४२) गाडीची झडती घेतली असता कारमध्ये २ लाख ३७ हजार १२६ रुपयाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी दोन कार आणि गुटखा असा एकूण ४ लाख ८७ हजार १२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना अटक केली. आरोपींवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप निरीक्षक वसंत मुळे, प्रशांत महाले, पोलीस कर्मचारी राजन महाडीक, प्रदीप शेलार, बाळासाहेब सुर्यवंशी, रमेश भिसे, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ यांच्या पथकाने केली.