पुणे पोलिसांच्या 5 जणांच्या पथकावर UP मध्ये हल्ला ! स्थानिकांकडून पोलिसांना बेदम मारहाण अन् इनोव्हाची प्रचंड तोडफोड (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बुधवार पेठेत पोलीस हवालदाराचा चाकुने सपासप वार करून खून केल्याच्या प्रकारणातील संशयित महिलेचा शोध घेण्यास गेलेल्या पुणे पोलिसांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. गाडीचा चुराडा झाला आहे. दरम्यान, स्थानिकांनी पोलिस पथकावर भ्याड हल्ला करत पोलिसांना बेदम मारहाण केली आहे. ते व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. ज्या कामासाठी पोलिस गेले होते ते काम मात्र फरासखाना पोलिसांनी करूनच दाखवले आणि त्या महिलेला पकडलेच. आता तिला घेऊन पोलीस परत निघाले आहेत. उत्तर प्रदेश येथील गाझियाबादमध्ये हा प्रकार घडला आहे.

गेल्या आठवड्यात बुधवार पेठेत मध्यरात्री तडीपार गुंड प्रवीण श्रीनिवास महाजन (वय 36) याने पोलीस हवालदाराचा घरी जात असताना अडवून गळ्यावर आणि पोटात चाकूने वार करून खून केला होता. याप्रकारणाने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुंड प्रवीण उर्फ पव्या याला पकडले होते. पण, पोलिसांचा खून एका तडीपाराने मध्यवस्तीत येऊन केल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, त्याच प्रकरणात एक संशयित महिला आरोपीसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यात मग पोलीस या महिलेचा शोध घेत होते. त्यावेळी ही महिला गाझियाबादला पसार झाली असल्याचे समजले. मग तिला शोधण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व त्यांचे सहकारी असे 5 जणांचे पथक गाझियाबाद येथे गेले होते. तिचा शोध घेत असताना ती येथील वेश्या वस्तीत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी पुन्हा आणखी दोन महिला कर्मचार्‍यांना गाझियाबाद येथे बोलवून घेतले आणि तिला पकडण्याचा प्लॅन केला.

स्थानिक पोलिसांची एक टीम बोलावली. त्यांना कल्पना दिली. त्यांनी काही अंतरावर नेलेली इनोव्हा कार पार्क केली. त्यानंतर त्या वस्तीत तिचा शोध सुरू केला. दोन टीम करून वेगवेगळ्या रस्त्याने जात होते. पण, पोलिसांचे पथक साध्या वेशात (सिव्हील) असल्याने येथील नागरिकांचा गैरसमज झाला आणि त्यांनी पार्क केलेली पोलिसांची खासगी गाडीची तोडफोड करण्यास सुरुवात केली, असे पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी केले आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून पोलिस पथकावर भ्याड हल्ला करण्यात आला. एवढेच नव्हे तर चक्क पोलिसांना लाथा मारण्यात आल्या.

दरम्यान, पोलिसांचे पथक जवळ असतानाच हा हल्ला झाला आहे. या जमावाने प्रचंड गोंधळ घातला होता. स्थानिक पोलिसांनी पटकन धाव घेत आले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. आता आपले पथक पुन्हा वापस येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर पकडण्यास गेलेल्या महिलेला पकडले असून, तिला पुण्यात घेऊन हे पथक येत आहे. स्थानिकांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.