पावसाळ्यात होणाऱ्या या ५ आजारांविषयी, हे आहेत सुरक्षेचे उपाय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पावसाळा हा रोगांना आमंत्रण देणारा ऋतू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या हंगामात पावसामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या डबकी, चिखल आणि घाण यामुळे डास आणि जीवाणूंचे (बॅक्टरीयल) आजार पसरत असतात. हवामानातील आर्द्रतेमुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस साठी अधिक पोषक वातावरण निर्माण होते जे पाणी आणि पदार्थ दूषित करतात ज्यामुळे शरीराचे रोग होतात.

जाणून घ्या पावसात होणारे हे ५ आजार :

१. मलेरिया – मलेरिया हा एक सामान्य परंतु गंभीर संसर्गजन्य आजार आहे. हा रोग साचलेल्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या डासांच्या चाव्यांमुळे होतो. हा रोग मादा अ‍ॅनाफिलेज डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. हा आजार टाळण्यासाठी आपल्या सभोवताल पाणी आणि डबकी साचू देऊ नका.

२. डेंगू – डेंग्यूचा ताप देखील डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यू पसरवणारे डास स्वच्छ पाण्यात निर्माण होत असल्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एडीस डासांच्या चाव्याव्दारे पसरणाऱ्या या आजारामुळे रुग्णाच्या संपूर्ण शरीरात आणि सांध्यामध्ये तीव्र वेदना होतात. हे टाळण्यासाठी मच्छरांपासून लांब राहा आणि घरातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्या.

३. डायरिया (अतिसार) – बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणारी अतिसार ही पावसाळ्यामध्ये सर्वात सामान्य समस्या आहे. पोटातील दुखण्याव्यतिरिक्त जुलाब यामध्ये प्रमुख लक्षण आहे. हे विशेषत: पावसाळ्यात प्रदूषित पाणी आणि खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे होत असल्याने अन्नपदार्थ झाकून ठेवा पाणी उकळून आणि गाळून प्या आणि काही खाण्यापूर्वी हात धुवा.

४. कॉलरा – हा रोग विब्रिओ कॉलरा नावाच्या बॅक्टेरियांमुळे पसरतो आणि दूषित अन्न व पेयांमुळे होतो. ओटीपोटात चमक निघण्याबरोबरच वारंवार उलट्या होणे आणि अतिसार ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत. यामुळे शरीरात पाण्याचा खनिजांचा अभाव होऊन रुग्ण खूप अशक्त होतो. हे टाळण्यासाठी, अन्न स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

५. चिकनगुनिया – चिकनगुनिया हा देखील डासांद्वारे पसरणारा ताप आहे. ज्याचा संसर्ग रुग्णाच्या शरीराच्या सांध्यावर देखील होतो. यामुळे सांध्यामध्ये तीव्र वेदना होते. यापासून वाचण्यासाठी पाणी साचून डबकी होण्यापासून टाळा जेणेकरून त्यामध्ये डास पैदा होणार नाही आणि रोगाचा प्रसार होणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त