कडक सॅल्युट ! भर उन्हात गर्भवती महिला DSP बजावतेय कर्तव्य, लोकांकडून कौतुकांचा ‘वर्षाव’

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांची आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेता देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लावलेल्या संचारबंदी दरम्यान स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावत आहेत.

दरम्यान दंतेवाडा, छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू गरोदरपणात कर्तव्य बजावत असतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोरोनाच्या कठीण काळात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच या महिला पोलिस अधिका-याच्या कर्तव्याला अनेकांनी सलामही ठोकला आहे.

लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या लोकांना कोरोनाची तीव्रता समजावून सांगत आहेत. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील करत आहेत. आयपीएस अधिकारी दिपांषु काब्रा यांनी गरोदरपणात कर्तव्य बजावणाऱ्या शिल्पा साहू यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शिल्पा यांनी लोकांना आवाहन केले की, आज आम्ही रस्त्यावर उभे आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरात सुरक्षित राहता येईल. कोरोनाच्या या संकटात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाचे कौतुक होत आहे. तर काहींनी मात्र त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी, या कठीण काळात काम करू नये असा सल्ला दिला आहे.