आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्यांना बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आयपीएल मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या युनीट ११ च्या पथकाने अटक केली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय सट्टेबाजांच्या मार्फत सट्टेबाजी सुरु असून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अब्दुल कादिर गफार छुटानी (२७), मिलिंद रमेश सोनी (२९), युसुफ मोहम्मद सुमार (५१), रोनी नवनीत रायचुरा (३४), मनोज सुर्यकांत लोटलीकर (२५) अशी पाच जणांची नावे आहेत.

आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या सुरु असलेल्या मॅचवर चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीजण बंद घरात सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कांदिवली पश्चिमच्या ऑस्कर रुग्णालयाजवळील रहिवाशी इमारतीत छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली. तर तेथून सट्टा लावण्यासाठी लागणारे साहित्य, २६ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, एक टिव्ही संच, एक सेट टॉप बॉक्स, दोन वायफाय राऊटर, सहा पॉस मशिन, दोन डोंगल, तीन पेन ड्राईव, एक नोटा मोजण्याचे यंत्र, आणि ९९ हजार ७०० रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे. पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात बेटींगचा मुख्य सुत्रधार हा ए. के. टोपणनावाने ओळखला जाणारा व्यक्ती असून तो सट्टा घेत असल्याचे समोर आले आहे. पाचही जण मुंबई, राजकोट, दिल्ली, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. त्यानुसार पुढील सखोल तपास सुरु आहे.

ही कामगिरी प्रकटिकरण १ पथकाचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, सहायक पोलीस आयुक्त अभय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, आनंद रावराणे, रईस शेख, सहायक पोलीस निरीक्षक नितीन उतेकर, शरद झिने, शेषराव शेळके, सहायक फौजदार मयेकर, कर्मचारी अविनाश शिंदे, शिवाजी सावंत, रविंद्र भांबिड, नलावडे, नितीन शिंदे, गोळे, परब, साळुंखे, सावंत लोटणकर, चव्हाण, गोरे, महिला पोलीस शिपाई अणेराव, ढगे यांच्या पथकाने पार पाडली.