बुलेट चोरणारी टोळी गजाआड, ९ लाखांच्या बुलेट जप्त

कोपरगाव : पोलीसनामा ऑनलाईन- कोपरगाव शहरात बुलेट चोरी करुन त्यांची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ९ लाख रुपये किंमतीच्या ६ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी कोपरगाव परिसरातून आणखी काही बुलेट चोरुन त्या परळी येथील साथिदारांच्या मदतीने विकल्याचे उघड झाले आहे.

रवी वाल्‍मीक चव्‍हाण, निलेश अर्जुन दवंगे (21, रा. खडकी), नाना उर्फ परमेश्वर पंडीतराव आघाव (32, रा. दौनापुर, ता. परळी, जि. बीड), बबन शंकर जाधव (23, रा. निंबुटा तांडा ता. परळी, जि. बीड), किरण गजरवाल (रा. मंगळवार बाजार, हिंगोली)  अशी अटक करण्यात आलेल्या बुलेट चोरांची नावे आहेत.

कोपरगाव शहरातील खडकी येथे राहणारे रवी वाल्‍मीक चव्‍हाण याने माणीक बंडू सोमासे यांची 25 हजाराची हिरो होडा सीडी डिलक्‍स चोरून नेली होती. त्‍याला अटक करून चौकशी केली असता त्‍याने निलेश अर्जुन दवंगे याच्‍या मदतीने ती चोरल्‍याचे सांगितले. त्या दोघांची पोलीस कोठडीत चौकशी केली असता त्‍यांनी कोपरगाव परिसरातून आणखी बुलेट चोरल्‍याचे सांगीतले. त्‍या बुलेट नाना उर्फ परमेश्वर पंडीतराव आघाव, बबन शंकर जाधव यांना दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्‍यांच्‍या गावातुन त्यांना ताब्‍यात घेऊन चोकशी केली. त्यांचा साथीदार किरण गजरवाल याच्या मदतीने मोटार सायकल परभणी, हिंगोली व परळी परिसरात विकल्‍याचे सांगितले. आरोपींकडून परळी, परभणी, हिंगोली परिसरातून बुलेट मोटारसायकली जप्‍त करण्यात आल्‍या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक ईशु सिंधु, अहमदनगरचे अप्‍पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी शिर्डी विभाग सोमनाथ वाघचौरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, नगरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार सोन्‍याबापु नानेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, पोलीस नाईक विशाल दळवी, रविंद्र कर्डीले, रवि सोनटक्‍के, विजय ठोंबरे, चालक बबन बेरड तसेच कोपरगाव पोलीस कॉन्सटेबल आर पी. पुंड, एस.जे अगरवाल, आर.सी. कोतकर यांनी केली.