Remdesivir शिवाय 5 हजार रुग्ण झाले बरे, नगर जिल्हयातील ‘या’ डॉक्टरची सर्वत्र चर्चा; जाणून घ्या उपचार पध्दती

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविरसाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे असताना मात्र अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडमधील आरोळे पॅटर्न जरा वेगळाच आहे. डॉ. रवी आरोळे रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी जवळपास 5 हजार रुग्णांना रेमडेसिविरचा वापर न करता कोरोनामुक्त केले आहे. आरोळे यांच्या जुलिया कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन, महागडी औषधांचा वापर केला जात नाही, तरी देखील रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.

सध्या सर्वत्र रेमडेसिविरची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविरशिवाय उपचार शक्य नसल्याचे अनेक डॉक्टरांचे, रुग्णालयांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रवी आरोळे यांनी रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांना कसे बरे करतात याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार गंभीर अवस्था असलेल्या 5 टक्के रुग्णांसाठी रेमडेसिविर वापरावे. पण एम्सच्या नव्या गाईडलाईन्सनुसार रेमडेसिविर वापरण्याची सक्ती नाही. कोरोनाचा परिणाम फुफ्फुसांवर होतो. फुफ्फुसांना सूज येते. शरीराला ऑक्सिजन कमी पडू लागतो. या दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. यापूर्वीही विविध आजारांमुळे फुफ्फुसांना सूज यायची. स्टेरॉईड्समुळे ही सूज कमी करता येते. स्टेरॉईड्स स्वस्त असतात आणि सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आम्ही सूज कमी करण्यासाठी स्टेरॉईड्स वापरतो. स्टेरॉईड्स किती द्यायचे याचे प्रमाण रुग्णाच्या वजनावर ठरते असे ते म्हणाले.

ऑक्सिजन कमी पडत असल्यास ऑक्सिजन थेरेपीचा वापर करतो. याशिवाय आम्ही ब्रॉन्कोडायलेटर्स वापरतो. सुरुवातीला स्टेरॉईड्स दिल्यानंतर आम्ही ब्रॉन्कोडायलेटर्सचा वापर करतो. ऑक्सिजन थेरेपी सुरू करतो. स्टेरॉईड्स, ऑक्सिजन थेरेपी, ब्रॉन्कोडायलेटर्स, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटिबायोटिक्स आदी चार गोष्टी मुख्य उपचारांचा भाग आहेत. यानंतरचे उपचार रुग्णात दिसणाऱ्या लक्षणांवर अवलंबून असतात. कोणाला डोकेदुखीचा त्रास होतो. कोणाला जुलाब होतात. या लक्षणांनुसार मग प्रत्येकाला उपचार दिले जातात असे डॉ. आरोळे म्हणाले.