1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशव्दारांवरील टोलच्या दरात 25 रूपयांपर्यंतची वाढ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मुंबईत खासगी वाहनाने ये-जा करणार्‍यांना आता वाढीव टोलचा भार सहन करावा लागणार आहे. 1 ऑक्टोबरपासून वाढीव टोलचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवरील कंपनीच्या टोलनाकांवर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

महानगर प्रदेशातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ होते. त्यानुसार आता 1 ऑक्टोबरपासून टोल दरवाढ होत असून कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात 5 रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर 40 रुपये करण्यात येणार आहे.

मिनी बस, 12 ते 20 प्रवाशांची वाहतूक करणार्‍या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 65 रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात 105 वरून 130 अशी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर अवजड वाहनांचा टोल 135 रुपयांवरून 160 रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये होणार आहे.