‘हायवे’वर 5 वर्षाचा मुलगा चालवत होता SUV, जात होता ‘Lamborghini’ खरेदी करायला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक 5 वर्षाचा मुलगा स्वतः त्याच्या पालकांची कार घेऊन घरातून निघाला. लॅम्बोर्गिनी (Lamborghini) विकत घेण्यासाठी तो मोठ्या शहराकडे जाऊ लागला. पण जाता जाता त्याला रस्त्यातच पोलिसांनी गाठले. ही घटना अमेरिकेच्या यूटाची आहे. एक 5 वर्षांचा मुलगा महामार्गावर कार चालवत कॅलिफोर्निया येथे जात होता. पण वाटेतच एका पोलिस अधिकाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष गेले.

पोलीस अधिकाऱ्याने पाहिले की एक व्यक्ती वेगाने वाहने चालणाऱ्या महामार्गावर अतिशय धीम्या पद्धतीने गाडी चालवत होता. पोलिसांना वाटले की एखादा आजारी किंवा दुर्बल व्यक्ती कार चालवत आहे. पण जेव्हा त्यांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला तेव्हा खरी परिस्थिती समोर आली. मुलाची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु पोलिसांनी सांगितले की तो एसयुव्ही कार चालवत होता. जेव्हा पोलिस त्याच्याकडे आले तेव्हा तो दोन्ही पायांनी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करीत होता. यानंतर पोलिसांनी कार साईडला घेण्यास त्याला मदत केली.

मुलाचे पालक कार्यालयात गेले होते आणि तो भावंडांसह घरी होता. दरम्यान, तो अचानक चावी घेऊन निघून गेला. वळण रस्त्यावर त्याला गाडी फिरविण्यात अडचण येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाने पोलिसांना सांगितले की तो यूटाहून कॅलिफोर्निया येथे लॅम्बोर्गिनी खरेदी करण्यासाठी जात होता. तथापि, त्याच्या खिशात फक्त 3 डॉलर्स आहेत हे त्याच्या लक्षात आले नाही. पोलिसांनी सांगितले की यापूर्वी त्याच्या आईने लक्झरी कार खरेदी करण्यास नकार दिला होता.