अपहरण झालेल्या 5 वर्षाच्या मुलीची पुणे पोलिसांकडून सुखरुप सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घराच्या मागील बाजूस खेळत असणाऱ्या 5 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून फरार झालेल्या दोन महिलांना विमानतळ पोलिसांनी आठ तासात अटक करून मुलीची सुखरुप सुटका केली. हा प्रकार शनिवारी (दि.16) दुपारी तीन ते साडे तीनच्या दरम्यान प्राईड आशियाना सोसायटी जवळ लोहगाव येथे घडला होता. पोलिसांनी दोन महिलांना सोलापूर येथून अटक करून 5 वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका केली.

जयश्री शिवाजी कोळी (वय-26 रा. माईचा वाडा, कात्रज गाव, पुणे), हिराबाई उर्फ बायडाबाई भानुदास खंडाळे (वय-55 रा. माईचा वाडा, कात्रजगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी मुरलीधर चांदमाने यांनी रविवारी (दि.17) विमानतळ पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या जयश्री काळे या महिलेला दोन मुले आणि एक मुलगी आहे. ती आपल्या दोन मुलं आणि मुलीसबोत कात्रज परिसरात वास्तव्यास होती. तिच्या मुलीचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, तिने मुलीच्या मृत्यूची माहिती आपल्या पतीला दिली नव्हती.

दरम्यान, पतीने जयश्रीला मुलांना घेऊन सोलापूर येथे बोलावले. पतिला मुलगी मृत झाल्याचे सांगितले नसल्याने घाबरलेल्या जयश्री कोळी या महिलेने फिर्य़ादी यांच्या मुलीचे अपहरण केले. तिला सोलापूर येथे घेऊन गेली. विमानतळ पोलिसांना मुलीचे अपहरण करून तिला सोलापूर येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सोलापूर येथे जाऊन मुलीचा शोध घेऊन भवानी पेठेतून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करून दोन महिलांना अटक केली.ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पुर्व विभाग सुनिल फुलारी, परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, सहायक पोलीस आयुक्त देसाई, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, तपास पथकातील अविनाश शेवाळे, विशाल गाडे, विश्वनाथ गोणे, संजय आढारी, राहुल मोरे, विनोद महाजन, प्रशांत कापुरे, नाना कर्चे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com