50 कोटींचं खंडणी प्रकरण : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची 4 तास चौकशी, अटकेची टांगती तलवार ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध सराफाला व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन 50 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणात संशयाच्या भोवर्‍यात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्याकडे गेल्या चार तासांपासून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेकडून ही चौकशी सुरू असून, त्यांना अटक होणार का याबाबत मात्र, चौकशी पुर्ण झाल्यानंतरच ठोस माहिती सांगता येईल अशी माहिती सुत्रांनी दिली.

सराफाला 50 कोटी रुपयांची खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी आशिष हरिश्चंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) तसेच संदेश वाडेकर यांना अटक केली आहे.

पोलीसांनी प्रथम तिघांकडे चौकशी केल्यानंतर सराफाकडे वाहन चालक म्हणून काम करणार्‍या संदेश वाडेकर याचे नाव समोर आले होते. त्यावरून पोलिसांनी त्याला गुरुवारी रात्री अटक केली. त्याचवेळी बांदल यांचे नाव समोर आले होते. त्यांनाही गुरूवारी चौकशीसाठी बोलविल्यानंतर पुन्हा शुक्रवारी बोलविण्यात आले होते. आज त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच तासांपासून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

मंगलदास बांदल यांची व सराफाची टिळक रस्त्यावरील एका कॅफेत भेट झाली होती. त्यावेळी रुपेश चौधरीही होता. दरम्यान बांदल यांनी एका व्यवहारासाठी आपली व सराफांची भेट झाली होती, असे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे सहभाग निश्चीत होत नसल्याचे सांगितले आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते हे करत आहेत.