नगरच्या व्यापाराची पुण्यातील व्यक्तीकडून 50 लाखांची फसवणूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरमधील व्यापाऱ्याला पुण्यातील व्यक्तीने 50 लाख रुपयांना गंडा घातला असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. भाड्याने बांधकाम साहित्य घेऊन गेला. परंतु, सदर साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून ही फसवणूक करण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बुरूडगाव येथील व्यापारी सतीश विश्वनाथ राऊत (रा. बुरूडगाव, ता. नगर) यांना देडगे म्हणाला की, ‘मी नवी मुंबई विमानतळ व पुण्यातील खडकवासला येथे मोठे काम घेतले आहे. त्यामुळे तुमचे बांधकाम साहित्य भाड्याने द्या.’ त्याच्यावर विश्वास ठेवून राऊत यांनी देडगे यांना 50 लाख 23 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य भाड्याने दिले.

सदर साहित्य परत देण्याऐवजी साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली. सदर साहित्याबाबत राऊत यांनी देडगे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाली आहे असे राऊत यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सतीश राऊत याच्या फिर्यादीवरून याप्रकरणी अभिमन्यू रामदास देडगे (रा. सिंहगड रोड, धायरी बुद्रुक, पुणे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.