Coronavirus : पश्चिम बंगालमध्ये NDRF च्या जवानांना ‘कोरोना’ची लागण

पोलिसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगाल आणि ओडिसा मध्ये धडकलेल्या अम्फान चक्रीवादळादरम्यान मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या टीमला तैनात करण्यात आले होते. या जवानांपैकी 50 जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.

ओडिसातील कटकमध्ये कार्यालयातील एनडीआरएफच्या 50 जवानांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोमवारी समोर आली. त्यानंतर एनडीआरएफच्या कार्यालयात खळबळ उडाली आहे. मागील महिन्यात आलेल्या अम्फान चक्रीवादळादरम्यान बचावकार्यासाठी ओडिसातून पश्चिम बंगालमध्ये या जवानांवना पाठवण्यात आले होते. या जवानांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.

एनडीआरएफचे महासंचालक सत्य नारायण प्रधान यांनी यासंदर्भात एक ट्विट केल आहे. पश्चिम बंगालमध्ये आलेल्या चक्रीवादळात दरम्यान मदत कार्यावरून परतलेल्या ओडिसाच्या 190 एनडीआरएफच्या जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी 50 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. कोरोनाची बाधा झालेल्या जवनांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.