Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर दिल्ली सरकारची मोठी घोषणा ! 72 लाख लोकांना रेशन ‘एकदम’ फ्री

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे देशात दहशत माजवली आहे. लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. सरकारने देखील लोकांना आपल्याच घरात राहण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत ज्या लोकांचे हातावर पोट आहे त्यांची अवस्था बिकट होऊ शकते. हे लक्षात घेऊन दिल्ली सरकारने पावले उचलली आहेत. दिल्लीत आता रेशनचा लाभ घेणाऱ्यांना नेहमीच्या रेशनपेक्षा 50 टक्के जास्त रेशन मिळणार आहे आणि ते ही मोफत.

दिल्ली सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळवा यासाठी 72 लाख रेशनधारकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा 2 कोटी दिल्लीकरांपैकी 72 लाख लोकांना मिळणार आहे. घरातून बाहेर पडू नये, घरुन काम करावे असे आवाहन सरकारने केल्यानंतर हातावरचे पोट असलेल्या लोकांसमोर मोठे संकट होते परंतु दिल्ली सरकारने याची दखल घेत हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयावर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती दिली की दिल्लीत तब्बल 72 लाख लोक रेशनच्या धान्याचा वापर करतात. 2 कोटी पैकी 72 लाख लोकांना रेशनद्वारे धान्य मिळते. त्यांना मिळणाऱ्या रेशनमध्ये थोडी वाढ करण्यात येणार आहे. सध्या जे रेशन मिळते त्यात ग्राहकांना 4 किलो गहू, 1 किलो तांदूळ आणि साखर मिळते. हे पुरेसं आहे परंतु आतापासून आम्ही या रेशनमध्ये 50 टक्क्यांनी वाढ करत आहोत. आता लोकांना साडेसात किलोचे रेशन मिळेल. एवढेच नाही तर हे रेशन त्या व्यक्तींना मोफत मिळेल.

दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर कोरोनाच्या भीतीत दिल्लीतील सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती देखील गंभीर आहे. महाराष्ट्रात देखील हातवरील पोट असलेल्या लोकांचे हाल होत असल्याचे दिसत आहे. सर्व काही बंद केल्याने जे लोक रोजावर जगतात. जे लोक घरकाम करतात त्यांना कामावर जाणे अशक्य झाले आहे, न गेल्यास त्यांना त्यांचे आणि कुटूंबाचे पोट भरणे अवघड होऊन बसेल. यामुळे राज्य सरकार यावर काय उपाय योजना करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशात कोरोनाची संख्या 250 वर पोहोचली आहे. त्यामुळे हे संकट आणखी विळखा घालण्यापूर्वी सर्वांना आवश्यक ती खबरदारी बाळगणं आणि उपाययोजना करणे गरजेचे होऊन बसले आहे.