मोटार वाहन Tax मध्ये 50 % सूट ! जाणून घ्या कोणाला मिळणार सवलत ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केल्याने आर्थिक संकटात अनेक क्षेत्र सापडले आहेत. यातील माल आणि प्रवासी वाहतूकदारांना मोटार वाहन करात आता 50 टक्के सूट मिळणार आहे, याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. त्यामुळे राज्यातील लाखो वाहतूकदारांना दिलासा मिळणाराय.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केलाय. तेव्हापासून राज्यभरातील प्रवासी वाहतूक बंद ठेवली होती. केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवासाची मुभा दिली होती. त्यानंतर टप्प्याटप्याने इतर वाहनांना परवानगी दिली. मात्र, दोन महिन्यांच्या काळात अनेक वाहने एकाच जागी उभी होती.

प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांना पाच महिन्यांनी परवानगी मिळालीय. त्यामुळे अनेक वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसलाय. त्यांची वाहने दोन ते पाच महिने वापराविना आणि विना उत्पन्न जागेवर उभी होती. तर, आता वाहतुकीला परवानगी मिळाली असली तरीही अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नाही, असेही आहे. त्यामुळे माल व प्रवासी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आलीय.

राज्य सरकारने वाहतूकदारांची ही आर्थिक कोंडी लक्षात घेऊन वाहतूकदारांना पुढील एक वर्षासाठी रोड टॅक्स माफ करावा, यांसह विविध मागण्या वाहतूकदारांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही संबंधित संघटनांकडून दिला होता. या सवार्ंची दखल घेत राज्य सरकारने आता वाहतूकदारांना दिलासा दिला आहे. तो म्हणजे, 50 टक्के मोटार वाहन कर माफ करण्याचा निर्णय घेऊन. या सवलतीसाठी पात्र कोण असणार? याचा तपशील देखील सरकारने दिलाय.

लाभासाठी पात्र कोण आहेत ?
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीसाठी मोटार वाहन कराचा भरणा केलेल्या वाहतूकदारांना या 50 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. अगोदर कर भरल्याची खातरजमा करून यंदाच्या करात सवत मिळणार आहे.

कोणाला मिळणार आहे हि सवलत ?
मालवाहतूकदार
पर्यटक वाहने
खानित्रे
खासगी सेवा वाहने
व्यावसायिक कॅपर्स वाहने
शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने.