मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर आणि अलिबाग मार्गांवर वातानुकूलित शिवशाही धावणार !

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – एसटी वाहतूक सेवा सुरु केल्यानंतर आता शिवशाही (shivshahi) देखील रस्त्यावर धावणार आहे. त्यानुसार ठाणे, बोरिवली, कल्याण येथून बोरिवली, मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर आणि अलिबाग या मार्गांवर वातानुकूलित शिवशाहीची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ठाणे-1 आगारातून 22, ठाणे -2 आगारातून 16 तर कल्याण आगारातून 12 अशा एकूण 50 शिवशाही (shivshahi) बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागला होता. त्याचा परिणाम खासगी व शासकीय क्षेत्रातील प्रवासी वाहतूक व्यवस्थेला बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटका देखील बसला आहे. त्यात एसटी महामंडळालादेखील आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला असून कामगारांचे वेतन देखील थकीत राहिले होते.

टाळेबंदीत शिथिलता आणून आर्थिकचक्र गतिमान करण्यासाठी विविध व्यावसायांना व वाहतुकीला शासनाने परवानगी दिली. यात आता वातानुकूलित शिवशाही बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून वरील मार्गांवर शिवशाही धावणार आहे. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांना गारेगार प्रवास करता येणार असून नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.