तेरा पीछा ना मैं छोडूंगा सोनिए…! ५० वर्षीय सीए (CA) मजनूचा प्रताप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात काही दिवसांपूर्वी एका प्रेमवीराने ‘शिवडे सॉरी’ अशा संदेशाचे होर्डिंग संपूर्ण शहरभर लावले होते. या होर्डिंग ने खूप खळबळ माजवली होती. आता मुंबईत देखील अशीच काहीशी घटना घडली आहे. पण या घटनेत ५० वर्षीय प्रेमवीराने एका महिलेबाबत प्रेमसंदेश भिंतीवर,रस्त्यांवरील फलकांवर, इमारतीच्या फलकांवर लिहिले. ती महिला जिथे जिथे जाते तिथे तिथे हा मजनू प्रेमसंदेश लिहीत होता शेवटी त्या महिलेच्या इमारतीवर देखील प्रेमसंदेश लिहिल्याने या महिलेने पोलिसात तक्रार केली त्यानंतर ५० वर्षीय के. के. शहा नावाच्या प्रेमवेड्याला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अनेक दिवसांपासून शहा भिंतींवर प्रेमसंदेश लिहित होता. या प्रेमसंदेशांकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. पण एक दिवस एक महिला चेंबूर पोलीस ठाण्यात धडकली आणि या प्रेमसंदेशांचा त्रास होत असल्याची तक्रार तिने दाखल केली. ती जिथेही जायची तिथे तिला हे संदेश दिसायचे. यापैकी काही संदेशांमध्ये तिचं नावही लिहिण्यात आलं होतं. तरीदेखील तिने दुर्लक्ष केलं. पण एकदिवशी ती राहत असलेल्या इमारतीच्या भिंतीवरही प्रेमसंदेश लिहिलेले तिला आढळले. त्यानंतर मात्र पोलीस स्टेशन गाठून अज्ञात व्यक्तीविरोधात तिने तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रेमसंदेशांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. जागोजागचे सीसीटीव्ही फुटेज चाचपले. यातून त्यांना शहाच्या गाडीचा नंबर कळला. त्यानंतर तो संदेश लिहित असतानाच पोलिसांनी त्याला रंगे हात पकडले. सध्या शहा पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.