बिटकॉइनमधून नफा मिळवण्याचे आमिष दाखवत ५०० कोटींचा गंडा

ठाणे: पोलीसनामा ऑनलाईन

क्रिप्टो करन्सी अर्थात आभासी चलन बीटकॉइन च्या माध्यमातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवत ठाण्यात अडीच हजार गुंतवणूकदारांना ५०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी मुंब्र्यातील कम्प्युटर इंजिनीअर तरुणाला अटक केली असून, मुख्य सूत्रधार अमित लखनपाल दुबईला फरार झाला आहे.

फ्लिनस्टोन ग्रूप नामक खोटी कंपनी उघडली

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ‘मनी ट्रेड कॉइन’मध्ये (एमटीसी) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत लखनपाल याने ठाणे आणि विक्रोळीमध्ये फ्लिनस्टोन ग्रूप कंपनीची कार्यालये उघडली. आपण अर्थ मंत्रालयाचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवले. सप्टेंबर, २०१७मध्ये या चलनाचा आयसीओ बाजारात आणून त्याचे नाव एमटीसी ठेवले. एचएसबीसी बँकेत २५० कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे बनावट सर्टिफिकेटही त्याने बनवले. या ठेवींपोटी १७५० कोटी रु.ची बँकेची हमी प्राप्त केल्याचाही ‘आभास’ निर्माण केला. एका ‘एमटीसी’चा दर ३ डॉलरवरून २५०० डॉलरपर्यंत पोहोचेल, असे तो सांगत असे. नंतर हा दर ६ हजार डॉलरपर्यंत पोहोचल्याचे जाहीर केले. मात्र परतावा न मिळाल्याने नवी दिल्लीतील गुंतवणूकदाराने तक्रार केल्यानंतर या फसवणुकीचा उलगडा झाला. यासाठी त्याने बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचेही समोर आले आहे. ठाणे पोलिसांनी फ्लिनस्टोन ग्रूप नामक कंपनीच्या कापुरवडी येथील कार्यालयावर छापा टाकून आभासी चलनाद्वारे होणारी फसवणूक उघडकीस आणली. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या चौकशीतून समोर आले आहे.

गुंतवणुकीवर कोणताही परतावा न मिळाल्याने प्रवीण अग्रवाल या दिल्लीतील व्यापाऱ्याने ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने फ्लिनस्टोन ग्रूपच्या दोन्ही कार्यालयांवर छापे टाकले. तिथे ५३ लॅपटॉप, शिक्के, मोबाइल आणि इतर बनावट कागदपत्रे आढळली. तसेच तहा हाफीज काझी (२६ रा. कौसा, मुंब्रा) या कम्प्युटर इंजिनीअरचा डिप्लोमा केलेल्या तरुणाला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. या प्रकरणाचा सूत्रधार अमित लखनपाल हा बाजारात डेबिट कार्ड आणण्याच्या प्रयत्नात होता. शिवाय त्याच्या एकूण १३ कंपन्या असून, यातील काही कंपन्या परदेशात नोंदणी केल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे.

आरोपी बसला दुबईत लपून

या प्रकरणात एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाची वादग्रस्त भूमिका समोर आली असून, त्याचे नाव मात्र गुप्त ठेवण्यात आले आहे. अमित लखनपाल याने १० कोटी ५० लाख कॉइन बनवले होते. मात्र २ कोटी कॉइन व्यवहारात आणले होते. मात्र, पैसे काढण्याची आणि एमटीसी विकण्याची सेवा बंद करण्यात आली होती. याबाबत गुंतवणूकदारांनी विचारणा केल्यानंतर तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली जात होती. कंपनीचा सूत्रधार अमित लखनपाल आणि त्याचे साथिदार फरार आहेत. लखनपाल दुबईत असून त्याला भारतात आणण्याविषयी प्रयत्न केले जातील, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी दिली.