दलितांच्या मतांसाठी भाजप शिजवणार ५ हजार किलो खिचडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतिहास काळापासून प्रसिद्ध असणारे रामलीला मैदान पुढील तीन आठवडे भाजपच्या झेंड्यांनी सजलेले पाहण्यास मिळणार आहे कारण भाजपच्या वतीने या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. रविवारी रामलीला मैदान भाजपच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेले होते त्याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दलित मतदारांना आकर्षिक करण्यासाठी ‘भीम महासंगम’ या कर्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी भाजपच्या वतीने एकाच भांड्यात ५ हजार किलोची खिचडी शिजवून हिंदू एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजपच्या कार्यक्रमासाठी रामलीला मैदानात जोरदार तयारी करण्यात आली असून रामलीला मैदान आता भाजपमय झाले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळ पासून या ठिकाणी गर्दी करायला सुरुवात केली असून ५ हजार किलो खिचडी बनवायला सुरुवात केली आहे. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हि खिचडी बनवत आहेत. हि खिचडी बनवण्यासाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरून तांदूळ आणि डाळ गोळा करून आणण्यात आली आहे. आता रॅलीला सुरुवात झाली असून भाजप या रॅली द्वारे सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विक्रम करू पाहते आहे. या अगोदर ९१८ किलो तांदुळाची खिचडी बनवण्याचा विक्रम जगप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. तोच विक्रम मोडण्याची तयारी भाजपने केली आहे.

या कार्यक्रमासाठी दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, भाजप महासचिव रामलाल, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या सहित अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. या रॅलीत ५० हजार लोक समाविष्ट होण्याची शक्यता असून ५ हजार किलो खिचडी बनवण्यासाठी विशिष्ठ भांडे तयार करून घेण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग मानण्यात येते आहे. सामाजिक समरसता हि भाजपची दलितांना जवळ करण्याची संकल्पना आहे. भाजपच्या कडव्या हिंदुत्वाच्या छबीचा तोटा पक्षाला होत आहे त्याच प्रमाणे याच पवित्र्यामुळे भाजप पासून लोक दूर चालले आहेत. हे चांगलेच जाणून असलेल्या भाजपने आता समरसतेचा नवा उपक्रम म्हणून ‘भीम महासंगम’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.