70 देशातील 50 हजार साधक एकाच वेळी करणार गीतापठण, लातूर जिल्ह्यातून 5 हजार साधकांचा सहभाग

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्षदा एकादशीला साजऱ्या होणाऱ्या गीता जयंतीनिमित्त यंदा 70 देशातील 50 हजार साधक एकाचवेळी भगवदगीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे पठण करणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी गीता पठण करण्याचा विश्वविक्रम या माध्यमातून नोंदवला जाणार आहे. या उपक्रमात लातूर जिल्ह्यातून 5 हजार साधक सहभागी होणार आहेत. गीताजयंती उत्सवानिमीत्त शुक्रवारी (दि.25) सायंकाळी 7 ते 8 या वेळेत जगभरातील 70 देशातील 50 हजारापेक्षा अधिक साधक गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करणार आहेत

पुज्य गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) यांनी स्थापन केलेल्या गीता परिवाराच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बालसंस्कार विषयात आचार्य आणि गीता परिवाराचे देशभर मोठे काम चालते. याच माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात त्यांनी 70 देशातील 52 हजार व्यक्तींकडून गीतेचे पाठांतर करून घेतलेले आहे.

दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या मोक्षदा एकादशीला गीता जयंती साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी शुक्रवार (दि. 25) भगवद्गीतेचा 5177 वा प्राकट्य दिवस अर्थात गीताजयंती साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी हा उत्सव ऑनलाईन होणार असून त्यातच या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा समावेश आहे.

देवाच्या मुखातून सांगण्यात आलेला गीता हा एकमेव ग्रंथ आहे. रणांगणावर म्हटला गेलेला आणि जयंती साजरी केला जाणारा देखील हा एकमेव ग्रंथ आहे. गीताजयंती उत्सवानिमीत्त शुक्रवारी सायंकाळी ७ ते ८ या कालावधीत जगभरातील 70 देशातील 50 हजारापेक्षा अधिक गीताप्रेमी गीतेच्या बाराव्या व पंधराव्या अध्यायाचे सामूहिक पठण करणार आहेत. याच कार्यक्रमात परिवाराचे संस्थापक तथा श्री राम जन्मभुमी मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज व पतंजली योगपिठाचे आचार्य बालकृष्ण मार्गदर्शन करणार आहेत. या उत्सवात सहभागी होणाऱ्यांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मागील महिन्यात एकाच वेळी 12 हजार गीता पाठकांनी गीता पठण्याचा विश्वविक्रम केला. आता 50 हजार जण एकाचवेळी गीतापठण करून आपलाच विक्रम मोडणार आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गीता परिवार लातुरच्या अध्यक्षा पुष्पा मालू, उपाध्यक्षा राजश्री कर्वा, सचिव मीनाक्षी सारडा, कोषाध्यक्ष नंदकिशोर बाहेती, व गीता प्रचार प्रमुख कांता धूत यांच्याशी संपर्क साधावा. गीतापठणात सहभागी होण्यासाठी https://learngeeta.net/j/62/ या लिंक वर क्लिक करून आपलाही सहभाग नोंदवावा, असे आवाहन लक्ष्मीकांत कर्वा यांनी केले आहे.