नमोपर्व 2.0 : मोदींच्या कॅबिनेटमधील ५६ मंत्र्यांपैकी तब्बल ५१ मंत्री ‘कोट्याधीश’ ; २२ जणांवर गंभीर गुन्हे दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात दुसऱ्या नमोपर्वाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींनी शपथवीधी पार पडल्यानंतर लगेचच खात्यांचे वाटप केले आहे. मोदींच्या नवीन कॅबिनेटमधील ५६ मंत्र्यांपैकी ५१ मंत्री करोडपती आहेत. तर २२ जणांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील १६ जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने दिली आहे.

मोदींच्या कॅबिनेटमधील प्रत्येक मंत्र्याकडे १४.७२ कोटींची संपत्ती आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांची सून आणि अकाली दल प्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची एकूण २१७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह चार मंत्र्यांकडे ४० कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. तर नव्या लोकसभेत निवडून आलेल्यांपैकी ४७५ खासदार करोडपती आहेत. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्याकडे ६६० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नव्याने निवडून आलेल्या भाजप खासदारांपैकी ३०१ जणांची प्रतिज्ञापत्रे एडीआरने तपासली. त्यातील ८८ टक्के म्हणजे २६५ खासदार करोडपती असल्याचे आढळून आले. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे सर्व १८ खासदार कोट्याधीश आहेत. काँग्रेसच्या ५१ खासदारांपैकी ४३ खासदार, द्रमुकच्या २३ खासदारांपैकी २२, तृणमूल काँग्रेसच्या २२ खासदारांपैकी २०, वायएसआर काँग्रेसच्या २२ खासदारांपैकी १९ खासदार करोडपती असल्याचे एडीआरने म्हटले आहे.