माल्ल्या – नीरव मोदीच नव्हे तर तब्बल 51 जणांचे देशातून ‘पलायन’, लावला 17900 कोटींचा ‘चुना’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशाची फसवणूक करून फरार झालेल्यांची नावं विचारली तर तुम्ही लगेच सांगाल की, विजय माल्ल्या, नीरव मोदी. कारण हे दोघेही फसवणूक करून देश सोडून पळून गेले आहेत. त्यांच्या फरार झाल्यानंतर मोदी सरकारवर जोरदार टीका झाली होती.

परंतु देशाची फसवणू करून देश सोडून पळून जाणारे हे केवळ दोनच उद्योगपती नाहीत. मोदी सरकारनं याबाबत संसदेत माहिती दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत देशातील 51 जणांनी बँकांना चुना लावून ते देश सोडून पळ काढला आहे. या 51 जणांनी देशाची 17900 कोटींची फसवणूक केली आहे आणि देशातून परागंदा झाले आहेत.

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत केंद्रीय तपास यंत्रणेच्या अहवलाचा संदर्भ देत देश सोडून पळून गेलेल्यांची माहिती दिली. ठाकूर यांनी सांगितल्याप्रमाणे, फसवणुकीच्या 66 प्रकरणांमध्ये 51 जण देश सोडून फरार झाले आहेत. या फरार आरोपींनी एकूण 17,947.11 कोटी रुपयांची देशाची फसवणूक केली आहे. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास अद्यापही सुरू आहे. या प्रकरणांमध्ये अंमलबजावणी संचलनालय आणि सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्रं दाखल केली आहेत.

देशाची फसवणूक करून देश सोडून जे आरोपी फरार झाले आहेत त्यांना परत आणण्यासाठी सीबीआय शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. ठाकूर यांनी सांगितलं की, केंद्रीय अप्रत्यक्ष कर विभाग सीमा शुल्क विभागानं आर्थिक अपहार करून पळून गेलल्या 6 आरोपींबद्दल अहवाल दिला आहे. इतकेच नाही तर अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं 10 आरोपींविरोधात आरोपपत्रं दाखल केली असून त्यापैकी 8 आरोपींविरोधात इंटरपोल रेड कॉर्नर नोटीसदेखील जारी केली आहे अशी माहितीही अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

Visit : Policenama.com